मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसात कोरोनाचा कहर वाढत असून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे खासगी व शासकीय रुग्णालयांनी सज्ज राहण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिल्या आहेत. त्याचवेळी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि येणाऱ्या नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना तपासणी, विभागीय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय प्राणवायू आणि औषधसाठा उपलब्धता, खासगी रुग्णालयांमधील कोविड सज्जता आदी बाबींचा आढावा घेतला. महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांनी कोरोनाचे आगामी संकट लक्षात घेऊन सज्ज राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
दुसरीकडे, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि येणाऱ्या नागरिकांनी मास्क लावणे सक्तीचे असणार आहे. सार्वजनिक ठिकाणाशी संबंधित महानगरपालिका कर्मचाऱ्यांनीही मास्क लावणे बंधनकारक असेल. येणाऱ्या काळात गृह विलगीकरण आणि अन्य निर्बंध पुन्हा लागू केले जाणार असल्याचेही इकबाल चहल यांनी म्हटले आहे.