मुंबई : प्रतिनिधी
आपल्या मुंबापुरीत यायचे. येथे पैसे कमवायचे. तिकडे आपल्या राज्यात पैसे पाठवायचे आणि इथे मराठीला विरोध करायचा ? असे करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
गुढीपाडव्याचे औचित्य साधून मुंबईमध्ये मराठी भाषा भवनाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मराठी भाषेबद्दल विरोध करणारांवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्रात राहून मराठीला विरोध करण्याचे काम काहीजण करत आहेत. महाराष्ट्रात येऊन प्रगती करता आणि मराठी भाषा, मराठी माणसाला का विरोध करता ? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी या मातीचे ऋण विसरू नका असा सल्ला दिला.
आम्ही दुकानाच्या पाट्या मराठीत असाव्यात, असा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाच्या विरोधात मराठी भाषेला विरोध करणाऱ्या मंडळीने न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांना मराठी भाषेत पाट्या असायला हव्यात.कारण त्या ग्राहकांना सोईच्या असतात, असे सांगत फटकारले. महाराष्ट्रात येऊन प्रगती करून मराठीला विरोध करणाऱ्यांना माझे एकच सांगणे आहे, महाराष्ट्रात येऊन मराठीला विरोध का करता ? असा सवाल अजित पवार यांनी केला.