मुंबई : प्रतिनिधी
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. प्रदीर्घ कायदेशीर लढाई आणि कष्टानंतर दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी दाखल केली होती.
ऋतुजा लटके यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार उभा केलेला नाही. ऋतुजा लटके यांचा या निवडणुकीत एकतर्फी विजय झाला आहे. शाहूवाडी तालुक्याच्या सुनबाई अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या आमदार झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे.
दादरच्या शिवसेना भवन आणि अंधेरी परिसरात ठाकरे गटाचे शिवसैनिक आनंदोत्सव साजरा करत आहेत. शिंदे गटाच्या विरोधात ’50 खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत आहेत. दरम्यान, निवडून जिंकल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपकडून कोणतीही सहानुभूती मिळालेली नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी सर्वेक्षण केले होते. भाजपचा पराभव होत आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्याचे ऋतुजा लटके यांनी सांगितले.
तसेच, हा माझा विजय नाही. हा विजय माझे दिवंगत पती रमेश लट्टे यांचा विजय आहे. सर्वप्रथम मी रमेश लटके यांची अपूर्ण विकासकामे पूर्ण करीन. मी मातोश्रीवर जाईन. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनःपूर्वक आभार. विजयाबद्दल कोणताही उत्सव होणार नाही, असेही ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केले.