पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरीयातून आलेल्या प्रवाशाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मात्र या प्रवाशाचा ओमीक्रॉन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी घरात थांबूनच नवीन वर्षाचं स्वागत करा असं आवाहन केलं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरीयातून आलेल्या एका प्रवाशाचा २८ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर या व्यक्तीचा ओमीक्रॉन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेते पार्थ पवार यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला घरी थांबूनच नवीन वर्षाचं स्वागत करा, असे आवाहन केले आहे.
मागील काही दिवसांत ओमीक्रॉनसह कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. पार्थ पवार यांनीही युवा वर्गासह सर्वच नागरिकांनी खबरदारी घ्यायला हवी असे म्हटले आहे. त्याचवेळी सध्याच्या प्रसाराकडे तिसरी लाट म्हणून पाहून प्रत्येकानेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.