पुणे : प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांची उमेदवारी जाहिर केली.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले होते.
काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मात्र उमेदवार कोण असणार याबाबत त्यांनी कोणतेही संकेत दिले नव्हते. त्यामुळे या उमेदवारीबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.
दरम्यान, चिंचवडच्या उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत नाना काटे यांची उमेदवारी जाहिर केली आहे.