नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल खोटी माहिती सोशल मिडीयात प्रसारित होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आणि अशक्तपणामुळे बुधवारी संध्याकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. परंतु आज दिवसभर त्यांच्या निधनाबद्दल खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्स रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यांना डेंग्युची लागण झाल्याची माहितीही पुढे आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियामध्ये मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत आहे. ही बातमी ही पुर्णपणे खोटी आहे, तसेच त्यांच्या मृत्यूची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, उलट त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.