बंगळुरू : वृत्तसंस्था
तामिळनाडू राज्यातील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांचे निधन झाले आहे.
कुन्नूर येथे लष्कराच्या हेलिकॅाप्टरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत वरुण सिंग हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यावर बंगळुरूतील कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान वरुण सिंग यांचे निधन झाले आहे.
वरुण सिंग हे वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजच्या सुलूर हवाई तळावर विंग कमांडर म्हणून कार्यरत होते. दरम्यानच्या काळात वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यामुळे देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. वरुण सिंग यांनी नियंत्रण गमावलेल्या एका विमानाला मोठा हिमतीने उतरवत मोठा अनर्थ टाळला होता. त्याबद्दल त्यांचा शौर्यचक्र देऊन गौरव करण्यात आला होता.