
लखनऊ : वृत्तसंस्था
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची उत्तर प्रदेशातील हापूर गढमुक्तेश्वर येथे जाहीर सभा झाली. या सभेसाठी लाखो रुपये खर्च करून मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आले होते. मात्र हे होर्डिंग्स सभेला आलेल्या लोकांनीच उखडून टाकले. सिलिंडरच्या किमती वाढल्याने फ्लेक्सचा उपयोग चुलीत जाळण्यासाठी करणार असल्याचं या नागरीकांनी सांगितलं.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जाहीर सभा संपल्यानंतर काही लोक होर्डिंग्सरील बॅनर काढून घेवून जावू लागले. यावर त्यांची प्रतिक्रिया काय असणार तर ‘आम्ही मजूर आहोत. भाड्याच्या घरात राहतो. गॅस सिलिंडर १००० हजार रुपयांपेक्षा महागला आहे. त्यामुळे बॅनरचा उपयोग आम्ही चुल पेटवण्यासाठी करु’. याशिवाय ‘लाकूड का नेत आहात’, असे त्यांना विचारल्यावर सिलिंडर खूप महाग असल्याचे सांगितले.
‘एनडीटीव्ही’ या राष्ट्रीय वाहिनीवर या संदर्भात वृत्त प्रसारित झाले आहे. या सभेवेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अखिलेश यादव यांच्यावर आरोप केलेत. सपा सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत एक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे असाही घणाघात त्यांनी केला आहे.