मुंबई : प्रतिनिधी
साउथचा सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वेगळे होण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या निर्णयामुळे चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
धनुषची पत्नी ऐश्वर्या ही साऊथच्या सुपस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. ऐश्वर्या ही दिग्दर्गक आणि पार्श्वगायिका असुन त्यांचा २००४ मध्ये विवाह सोहळा पार पडला. त्यांना यात्रा आणि लिंगा अशी दोन अपत्ये आहेत. धनुषने ट्विट करत वेगळे होत असल्याचे सांगितले.
आम्ही १८ वर्षे एकत्र मित्र, जोडीदार एकमेकांचे हितचिंतक आणि पालक म्हणून पुर्ण केली. इथून पुढे आमचे मार्ग वेगळे असतील. या प्रवासात आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेत आहे. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि या निर्णयाला सामोरे जाण्यासाठी आम्हाला पाहिजे तेवढा खाजगी वेळ द्या”. अशी पोस्ट धनुष ने केली आहे. तर दुसरीकडे हीच पोस्ट ऐश्वर्या ने इंस्टाग्रामवर शेअर करत ‘कॅप्शनची गरज नाही, फक्त तुमच्या प्रेमाची आणि समजून घेण्याची गरज आहे’, असे म्हटले आहे.
‘अतरंगी रे’ हा धनुषचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘सर’ हा त्याचा दुसरा तमिळ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत त्याने ४६ चित्रपटात काम केले असुन १ फिल्म फेअर अवॉर्ड, ४ राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.
गेल्यावर्षी साऊथचे दिग्गज जोडपे समंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्या पाठोपाठ आता धनुष आणि ऐश्वर्या यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.