Site icon Aapli Baramati News

Big News : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; शनिवारी शेतकरी घरी परतणार

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  

दिल्लीच्या सीमेवर एका वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेले शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आज सकाळी केंद्र सरकारचे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी  शनिवारी (दि.११ डिसेंबर) दिल्लीची सीमा सोडून आपापल्या घरी परतणार आहेत.

केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. मात्र वर्षभर चालू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि एमएसपी कायदा तयार करावा, या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलन चालूच ठेवले होते. याबाबत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे.

एमएसपीचा कायदा लागू करण्यासह शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.  आंदोलन थांबवल्यानंतर आंदोलन स्थळावरील तंबू सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत आणि संरक्षण दलाचे अधिकारी यांच्यावर उद्या (दि.१०डिसेंबर) दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल कोणताही जल्लोष न करता हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा घेतली जाणार आहे. त्यानंतर शनिवारी दि. ११ डिसेंबर रोजी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी आपापल्या घरी परतणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version