नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब ठरलेल्या आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमीक्रॉन या नव्या घातक कोरोना व्हेरीएंटचा भारतातही शिरकाव झाला आहे. या नव्या विषाणूचे कर्नाटक राज्यात दोन रुग्ण आढळले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात दोन रुग्ण आढळल्यामुळे सर्वत्र चिंता वाढली आहे.
देशात आढळलेले ओमिक्रोनचे दोन्ही रुग्ण कर्नाटक राज्यातील असून हे दोघे ६६ आणि ४४ वर्षांचे पुरुष आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णांपैकी एक रुग्ण ११ तारखेला आणि दुसरा रुग्ण २० तारखेला आफ्रिकेमधून भारतात परतलेला होता. भारतात परतल्यानंतर त्यांची तपासणी केली असता दोघांचंही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सुरुवातीला या दोघांमध्येही कोरोणाचे सौम्य लक्षणे दिसत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती.
या दोघा प्रवाशांच्या ओमीक्रॉनच्याही तपासण्या करण्यात आल्या. काल रात्री उशिरा या तपासण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांवरही उपचार चालू आहेत. भारतात ओमीक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.