ग्वाल्हेर : वृत्तसंस्था
कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही. पण माणूस कुत्र्याला चावला तर ती नक्कीच बातमी होते. असाच काहीसा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर जिल्ह्यात घडला आहे. एका पित्याने मुलाला चावा घेणाऱ्या कुत्र्याचे चक्क पायच कापून टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीमित्रांनी याबाबत तक्रार केली. त्यानुसार संबंधित पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिमरियातल गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याने एका मुलाच्या तोंडाला चावा घेतला. त्यामुळे संतापलेल्या बापाने क्रूर वृत्तीने धारदार चाकूने त्या कुत्र्याचे पाय कापले आहेत. काही दिवसापूर्वी ही घटना घडली होती. रविवारी या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाला. त्यानंतर एका प्राणी मित्र संघटनेने पोलिसात तक्रार दाखल केली.
व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये, तो व्यक्ती कुत्र्याला लोखंडी रॉडने मारताना दिसत आहे. नंतर तो व्यक्ती धारदार चाकूने त्या कुत्र्याचे पाय कापताना दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमलच्या (पेटा) कार्यकर्त्या छाया तोमर यांनी ग्वाल्हेर पोलिसात तक्रार नोंदवली असून त्या व्यक्ती विरोधात कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सागर विश्वास याला अटक केली आहे.