Site icon Aapli Baramati News

शिक्षण राज्यमंत्री अन्नापुर्णा देवी यांच्याकडून CBSE च्या शिक्षक आणि प्राचार्यांचा सन्मान

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : प्रतिनिधी 

शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज अध्यापन आणि शालेय नेतृत्वातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारतातील आणि भारताबाहेरील सीबीएसई संलग्न शाळांचे २२ शिक्षक आणि प्राचार्यांना सन्मानित केले. सत्कार समारंभ ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आला होता, त्या दरम्यान वर्ष २०२०-२१ साठी पुरस्कार देण्यात आले. यावेळी सीबीएसईचे अध्यक्ष मनोज आहुजा, सचिव अनुराग त्रिपाठी आणि सीबीएसईचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

२२ पुरस्कारप्राप्त प्राथमिक, मध्यम, माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील शिक्षक आहेत, ज्यांनी कोविड -१९ महामारी दरम्यान, आव्हानांचा सामना केला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले. पुरस्कार विजेत्यांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी शिक्षकांच्या अध्यापन आणि शिकण्याच्या उत्कटतेबद्दल कौतुक केले.

आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, “कोविड -१९ सारख्या परिस्थितीत, आमच्या शिक्षकांनी कठीण परिस्थिती असूनही विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम चालू ठेवले आहे आणि साथीच्या रोगाला अडथळा बनू दिले नाही. शिक्षकांनी शिकवण्याच्या नवीन पद्धती स्वीकारल्या आणि मुलांना उत्साही ठेवण्यासाठी नवीन रणनीती शिकवल्या. म्हणूनच आजचा दिवस शिक्षकांच्या शिकवणीला समर्पित आहे.

केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, ‘हेच कारण आहे की, डॉक्टर, नर्सेसह इतरांसोबत शिक्षकांनाही कोरोना योद्ध्यांच्या श्रेणीत घेतले गेले आहे. सीबीएसईला संपूर्ण देशासह त्याच्या शिक्षक समुदायाचा अभिमान आहे. त्याचबरोबर विजेत्यांना या कार्यक्रमात ५० हजार रुपये, शाल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version