आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमुंबई

विधानमंडळ होणार जनतेसाठी खुले!

महानगरे
ह्याचा प्रसार करा

राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर निर्णय!

राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला आहे. गौरवशाली वारसा लाभलेली ही वास्तू सर्वांना बघण्यासाठी खुली व्हावी आणि त्याद्वारे पर्यटनाला चालना मिळावी, हा यामागील उद्देश आहे.

यासंदर्भात विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. या विधानमंडळातून अनेक दिग्गजांनी लोकसेवेची कारकीर्द गाजविली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल. ही वास्तू राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र व्हावे, असा संकल्प करण्यात आला आहे.’ प्रारंभी मुंबई विधानमंडळात ही सुविधा सुरू करून कालांतराने नागपूर व पुणे येथील विधानमंडळ वास्तूही जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्याचे निर्देश पटोले यांनी दिले.

यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्यामुळे पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. या संदर्भात पर्यटन विभागाकडून सकारात्मकदृष्ट्या सहकार्य केले जाईल. पर्यटन विभाग, विधानमंडळ सचिवालय आणि गृह विभागामार्फत संयुक्तपणे नियमावली तयार करण्यात येईल. स्वागत कक्ष, पर्यटकांचे स्क्रीनिंग, ऑनलाइन बुकिंग अशा विविध सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश ठाकरे यांनी दिले.  


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us