
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपचे युवा नेते वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. त्यातून ते सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत जाहीर टीका करत आहेत. पक्षनेतृत्वावर नाराज असलेले वरुण गांधी लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान वरुण गांधी हे ममता बॅनर्जी यांच्याशी पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.
वरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या धोरणांसह केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्य सरकारवर टीका करत आहेत. केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वरुण गांधी आणि त्यांच्या मातोश्री मेनका गांधी यांना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमधून पक्षाने काढून टाकले आहे. त्यामुळे वरूण गांधी भाजपविरोधात अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. लखिमपुर हिंसाचारप्रकरणी त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे वरुण गांधी पक्ष सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत होते.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपला धूळ चारत मोठ्या बहुमताने विजय मिळवला आहे. त्यामुळे देशात भाजपविरोधी तृणमूल काँग्रेस हा मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. पुढील आठवड्यात ममता बॅनर्जी यांचा दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात वरुण गांधी हे ममता बॅनर्जी यांच्याशी पक्ष प्रवेशासंबंधी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वरुण गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असाही अंदाज वर्तवला जात आहे.