चंदिगड : वृत्तसंस्था
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद थांबायला तयार नाही. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस हायकमांडवर निशाणा साधत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभवच नाही, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली आहे. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
काही दिवसांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. परंतु त्यानंतर अंतर्गत वाद आणखीनच चिघळत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात पूर्ण ताकतीनिशी लढायला तयार आहोत. या घातक माणसापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी मी कोणतीही त्यागाची भूमिका स्वीकारण्यास तयार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सिद्धूंविरोधात पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
सोनिया गांधी यांनी मला मुख्यमंत्री पदावर राहण्यास सांगितले होते. मी तीन आठवड्यापूर्वीच राजीनामा देण्याच्या तयारीत होतो. मी तेव्हाच राजीनामा देणार होतो. परंतु त्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले. पक्षाचे सल्लागार हे पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी एक माजी सैनिक आहे. त्यामुळे युद्ध कसे करायचे मला चांगलेच माहिती असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळातील संघर्षाचे संकेत दिले आहेत.