Site icon Aapli Baramati News

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय गोव्यात सरकार बनवणे अशक्य : नवाब मलिक यांचा दावा

ह्याचा प्रसार करा

पणजी : वृत्तसंस्था

गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्याच प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. सगळ्या पक्षांकडून गोव्यात आपलेच बहुमत येणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गोव्यामध्ये राष्ट्रवादी कांग्रेसशिवाय सरकार बनवणे अशक्य असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आज नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वचननामा प्रसिद्ध केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. नवाब मलिक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यातील १३ विधानसभेच्या जागा लढवत आहे. गोव्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय गोव्यात सरकार बनवणे अशक्य आहे. बिगर भाजपाच्या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास गोव्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.सिंचनाच्या व्यवस्था, ग्रीन हाऊसेसची सुविधा, फळबाग-फुलबागा फुलविण्यासाठी विविध अनुदाने देण्यात येतील. पशूसंवर्धन व पशूपालनाच्या माध्यमातून जोडधंदा देण्यासाठी प्रयत्न केले जातील.गोव्यात कुटुंबआधारीत पर्यटन कसे वाढवता येईल, याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून गोव्याचा कायापालट करु, असे आश्वासन नवाब मलिक यांनी दिले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version