
मुंबई : प्रतिनिधी
लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हा विषय कायम वादग्रस्त ठरला आहे. या फोटोवरुन विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. मात्र आता लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो नसणार आहे. आगामी निवडणुकांमुळे लसीकरण प्रमाणपत्रावरुन नरेंद्र मोदी यांचा फोटो तूर्तास हटवला जाणार आहे.
१० फेब्रुवारीपासून ५ राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. ८ जानेवारीपासून निवडणूक आयोगाने या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे त्यामुळे सरकारला नवीन योजनांची घोषणा करता येऊ शकणार नाही. त्याचबरोबर आपली जाहिरात किंवा प्रचार करता येऊ शकणार नाही. त्यामुळे निवडणुकीच्या काळात लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसणार नाही.
गेल्या वर्षी निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रमाणपत्रावर असणारा मोदींचा फोटो आचारसंहिता भंग करणारा आहे, असा दावा केला होता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगानं आरोग्य मंत्रालयास पत्र लिहित मोदींचा फोटो असणे आचारसंहिता भंग ठरत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता निवडणुकीच्या काळात आचार संहिता लागू असल्यामूळे लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसणार आहे.