नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने एका कार्यक्रमात ‘ १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी होवू लागली आहे. टीकेला प्रत्युत्तर देताना कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून मी पद्मश्री पुरस्कार परत द्यायला तयार आहे, मात्र मी शहिदांचा अपमान केला हे सिद्ध करून दाखवावं, असे कंगनाने म्हटले आहे.
कंगना राणावत हिला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य भीक होते. खऱ्या अर्थाने देशाला २०१४ साली स्वातंत्र्य मिळालं आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. वादग्रस्त विधानानंतर कंगनावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. तसेच केंद्र शासनाने दिलेला पद्मश्री पुरस्कार पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणीही सोशल मीडिया वरून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
कंगणाने आज इंस्टाग्राम स्टोरीमधून एक छायाचित्र शेअर केले आहे. राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांच्याबद्दल मी त्या मुलाखतीत स्पष्ट बोलले होते. १८५७ सालच्या उठावासाठी संघटित लढाई लढली गेली होती. त्याच प्रकारे १९४७ मध्ये कोणती लढाई लढली गेली होती. याबद्दल मला कोणी सांगेल का? जर मला कोणी सांगितले तर मी माफी मागेल. तसेच मी माझा पद्मश्री पुरस्कार पुन्हा परत करेल, कृपया मला मदत करा असेही तिने या स्टोरीत नमूद केले आहे.