नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही मुख्यमंत्री बदलण्याची मालिका सुरू केली आहे. नुकतेच पंजाबचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता राजस्थानमध्येही खांदेपालट होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सचिन पायलट यांच्याकडे येण्याची वर्तवली जात आहे. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जागी पायलट यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेस पक्षाकडे सध्या तरुण चेहऱ्यांची कमी आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जतीन प्रसाद, सुष्मिता देव या तरुण नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे असंतुष्ट नेत्यांना दूर ठेवत काँग्रेस पक्षाची जबाबदारी पक्षातील तरुण नेतृत्वाकडे देण्याचे काँग्रेस हायकमांडने ठरवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सचिन पायलट यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पायलट यांनाही कल्पना देण्यात आलेली आहे. मात्र ही जबाबदारी त्यांच्याकडे कधी येईल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील तरुण नेत्यांची फळी कमी होत असतानाच गुजरात मधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी व बिहारचे जेएनयु विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हे काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. लवकरच त्यांचा राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश सोहळा होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. जिग्नेश मेवाणी आणि कन्हैयाकुमार यांच्या माध्यमातून पक्षाला तरुण नेतृत्व मिळणार आहेत.