लखनऊ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील लखिमपुर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत आठ जण मृत्युमुखी पडले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी घटनास्थळी सांत्वन करण्यासाठी चालल्या होत्या. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर तणाव निर्माण झाल्याने सरकारने कलम १४४ लागू केला आहे. त्यामुळे शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली हरगाव पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर; त्यांना सीतापुर येथील पीएससी गेस्ट हाउसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. हिंसाचाराच्या घटनेमुळे उत्तर परदेशात मोठी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने कलम १४४ लागू केले आहे.
गांधी यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत. त्यामुळे हरगाव पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली प्रियंका गांधी, खासदार दिपेन्द्र हुड्डा, उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासह इतर नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान , प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर देशात काँग्रेसकडून विविध ठिकाणी निदर्शने नोंदविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल उत्तर प्रदेशला गेले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना विमानतळावर अडवले आहे. पोलिसांनी त्यांना सीतापुर जिल्ह्यात जाण्यास रोखले आहे.