
पणजी : वृत्तसंस्था
पणजी विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपाकडे घराणेशाहीचा मुद्दा आडवा येत असेल तर वाळपई-पर्ये आणि पणजी-ताळगावात एकाच कुटुंबात दिलेल्या उमेदवारीला काय म्हणायचे असा खोचक प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी ‘गोव्यात पुन्हा भाजपाची सत्ता येणार नाही; तसं मी लिहून देतो’, असं मोठं विधान केलं आहे.
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत नऊ उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले, मनोहर पर्रीकर यांच्या सोबत आमचे जरूर मतभेद होते. मात्र त्यांच्या कुटुंबाचा आम्ही आदर करतो. भाजपाकडून उत्पल पर्रीकर यांच्या कर्तुत्वापेक्षा घराणेशाहीचा मुद्दा आडवा येत असेल तर ते योग्य नाही.
उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यादव यांच्या सुनेला भाजपाकडून मिळालेली उमेदवारी ही घराणेशाहीच आहे. वाळपई-पर्ये आणि पणजी-ताळगावात एकच कुटुंबात उमेदवारी दिली आहे. ही घराणेशाही नाही का असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
जर उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली तर; आम्हीपण पणजीमधील आमचा उमेदवार मागे घेऊन उत्पल परिकर यांना पाठिंबा देऊ. परंतु त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर भाजपाला पाठिंबा देणार नाही असे लिहून घेतले जाईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.