पणजी : वृत्तसंस्था
गोव्यात गेल्या पाच वर्षांपासून बेरोजगारी वाढली असून भाजप सरकारने राज्याची दुर्दशा केली असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. त्याचवेळी भाजपच्या नाकर्तेपणामुळेच त्यांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार विकत घ्यावे लागले असा दावाही त्यांनी केला आहे.
गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात भाजप विरोधात येणाऱ्या सरकारमध्ये आम्ही असणार आहे. राज्याला चांगले लोकाभिमुख सरकार देण्याचा आमचा संकल्प आहे. त्याचबरोबर रोजगाराची समस्या सोडवणे, योग्य धोरण आणि संपत्तीचे रक्षण करून विकास साधणे हे आमचं लक्ष्य असणार आहे, असे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
डॉ.प्रमोद सावंत सोडले तर सध्याच्या स्थितीला सर्व उमेदवार हे भाजपने दुसऱ्या पक्षातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांचे स्वत:चे कार्यकर्तेदेखील नाहीत, हे त्यावरून स्पष्ट होत आहे. भाजपने पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे केले आहेत. भाजप हे उमेदवार सुधारले आहेत असे सांगत आहेत. मात्र कुठल्याही गंगेत आंघोळ केली तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. भाजपमध्ये सर्वात जास्त वंशवाद दिसून येत असल्याचेही मलिक यांनी नमूद केले.