पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं शांतपणे तयारी सुरू केली असून शहरात पक्षाची जबाबदारी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांवर टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस लक्ष ठेवून आहे. भाजपच्या नाराज गटाला आणि नाराज नगरसेवकांना चुचकारण्याचा प्रयत्नही ‘राष्ट्रवादी’कडून सुरू आहे. एवढेच नाही, तर महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलेल्या काही नगरसेवकांच्या घरवापसीसाठीही ‘राष्ट्रवादी’कडून प्रयत्न सुरू आहेत.
फेब्रुवारी २०२२मध्ये येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शांततेत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यासाठी अजित पवार यांनी पिंपरी महापालिकेची सत्ता पुन्हा खेचून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते नेते काम करत आहेत, कोणते नेते काम करत नाहीत, कोणत्या नेत्यांमध्ये आपसात भांडणे आहेत, कोणते पदाधिकारी पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहेत; तसेच सध्या कोणते कार्यकर्ते पक्षाचे जोमाने काम करत आहेत, याची सर्व माहिती पक्षाकडून संकलित केली जात आहे.
शहराच्या प्रत्येक भागात पक्षाचे काही लोक फिरत असून, आढावा घेत आहेत. कोणत्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर आहे, तसेच कोण मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. याबरोबच राष्ट्रवादी काँग्रेसची एक कोअर टीम शहर भाजपच्या प्रत्येक हलचालीवर नजर ठेवून आहे. भाजपमधील गटबाजी कशी सुरू आहे, कोणत्या कारणाने भाजपमध्ये भांडणे होत आहेत, कोणाकोणात वितुष्ट आहे, याची इत्थंभूत माहिती पक्षाकडून घेतली जात आहे, असे राष्ट्रवादी काँगेसमधील सूत्रांनी सांगितले.