चंदिगड : वृत्तसंस्था
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या बंगल्यावर राहणारी त्यांची पाकिस्तानची मैत्रीण अरुसा आलम ही महिला कोण होती याबाबत अमरिंदर सिंग यांची चौकशी होणार आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून ही महिला अमरिंदर सिंग यांच्या बंगल्यावर राहत होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी पोलीस महासंचालक इकबालप्रीत सहोता यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे अमरिंदरसिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण अरुसा आलम ही पेशाने पत्रकार आहे. अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना ती गेल्या साडेचार वर्षापासून त्यांच्या सरकारी सरकारी बंगल्यावर राहत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने पंजाब सरकार अमरिंदर सिंग यांची चौकशी करणार आहे. अरुसा आलम यांच्याविषयी प्राथमिक चौकशीत अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यांचा संबंध आयएसआय’ या दहशतवादी संघटनेशी आहे काय ? याबाबत सखोल चौकशी केली जाणार असल्याचे रंधावा यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते हरमिंदरसिंग जस्सी यांच्या सभेत मौड बाजारात झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये नऊ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या स्फोटांप्रकरणी सुखजिंदरसिंग रंधावा यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर बोट ठेवले आहे. मात्र हा बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला हे अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी पंजाब सरकार पुन्हा नव्याने चौकशी करणार असल्याचे रांधवा यांनी म्हटले आहे. या सर्व कारणांमुळे कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पंजाब काँग्रेस यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.