
निरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (वय ४१) याचा मृत्यू झाला आहे. अज्ञात व्यक्तींनी हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजता नीरा येथील पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील बसस्थानकानजीक गुंड गणेश विठ्ठल रासकर हा पल्सर गाडीवर आला होता. त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून दोन गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात खोलवर जखम झाली आहे. त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारापूर्वीच गंभीररित्या जखमी झालेल्या गणेश रासकर याला मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृतदेह पुढील सोपस्कारांसाठी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर निरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.