
नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशामध्ये न्यायव्यवस्थेवर जाणीवपूर्वक आणि ठरवून हल्ले केले जात आहेत. जाणीवपूर्वक होत असलेल्या या हल्ल्यांपासून न्यायव्यवस्था वाचवा, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी देशातील वकिलांना केले आहे.
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण सगळे एक मोठा परिवार आहोत. तुम्ही सगळ्यांनी न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेला मदत करायला हवी. देशामध्ये सध्या विशिष्ट हेतूने आणि जाणीवपूर्वक ठरवून न्यायव्यवस्थेवर हल्ले चढवले जात आहेत. मात्र तुम्ही या हल्ल्यांपासून न्यायव्यवस्था वाचवा. न्यायव्यवस्थेचे रक्षण करा. जे योग्य असेल आणि न्याय्य असेल त्याची पाठराखण करण्यास कमी पडू नका असेही त्यांनी नमूद केले आहे.
रमण्णा पुढे म्हणाले, विविध वैचारिक मतमतांतरे घडवून आणणे आणि चर्चेला वाव देणे हे आपल्या राज्यघटनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. असेच मतमतांतरे आणि चर्चेमधून विकास साधला जातो. त्यातूनच देशाचे स्थित्यंतर घडते आणि लोकांचे सर्वोच्च कल्याण साधले जाते. मात्र या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष आणि दृश्य या स्वरूपात वकिलांची आणि न्यायाधीशांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही रमणा यांनी सांगितले आहे.