पणजी : वृत्तसंस्था
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. तृणमूल काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत युती केली आहे. यानिमित्ताने एका आयोजित सभेत ममता बॅनर्जी यांनी ‘एक गुजराती देशभर फिरु शकतो तर मग बंगाली का नाही ?’ असा खोचक सवाल सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला बंगाली असल्याचे सांगितले जाते. मग ते कोण आहेत? आपण त्यांना कधी गुजराती असल्याचे म्हणतो का? एक बंगाली देशाचे राष्ट्रगीत लिहू शकतो. परंतु गोव्यात येऊ शकत नाही. महात्मा गांधी हे बंगाली आहेत का ? गुजराती आहेत ? उत्तर प्रदेशातील आहेत? असे कधी विचारले का? असे प्रश्न उपस्थित करत जो नेता सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जात असतो, तोच राष्ट्रीय नेता असतो अशी खोचक टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.
मतदानाची वेळ आल्यावर आम्ही गंगेच्या पूजनासाठी जात नाहीत. नरेंद्र मोदी निवडणुका तोंडावर आल्यावर स्वत:च पुजारी बनतात, गंगेत डुबकी मारतात. उत्तराखंडमध्ये मंदिरात तपस्येला जातात. निवडणूक आल्यावर त्यांना तसे करण्याचे स्वतंत्र असते. परंतु वर्षभर ते कुठे असतात? ज्या गंगेत त्यांनी डुबकी मारली, त्याच गंगेत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाचे मृतदेह फेकत गंगा अपवित्र केली. परंतु सरकारकडे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची आकडेवारी नसल्याचे त्यांनी नमूद केले.