
अहमदाबाद : वृत्तसंस्था
अहमदाबादमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुराव्याअभावी २८ जणांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १४ वर्षानंतर या खटल्याचा अंतिम निकाल देण्यात आला.
विशेष न्यायमूर्ती ए .आर. पटेल यांनी आमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी निकाल देताना बॉंबस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदाबादमध्ये २८ जुलै २००८ रोजी तब्बल ७० मिनिटे पाठोपाठ २१ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात ५६ नागरिकांनी आपला जीव गमावला होता. तर २०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते. गुजरातमधील गोध्रा हत्याकांड दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने हे हल्ले केले होते.