मुंबई : प्रतिनिधी
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेली पद्मश्री प्राप्त अभिनेत्री कंगना राणावत हिने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भिक होते, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले आहे, असे वादग्रस्त विधान कंगना राणावतने केले आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर सोशल मीडियातून टीका होवू लागली आहे.
केंद्र शासनाकडून नुकताच कंगना राणावतला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगना राणावत ही तिच्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असते. अशातच कंगना राणावतने १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भिक होते, खरे स्वातंत्र्य हे २०१४ मिळालेले आहे. झाशीची राणी, नेताजी सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर यांना एक हिंदुस्तानी दुसऱ्या हिंदुस्तानीवर वार करणार नाही हे माहिती होते. स्वातंत्र्यासाठी किंमत मोजली आहे हे खरे असले तरी हे स्वातंत्र्य भीक होते. खरे स्वातंत्र्य हे २०१४ ला मिळाल्याचे कंगना राणावतने म्हणले आहे.
कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर टिका होवू लागली आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी मानसिकदृष्ट्या स्थिर नसलेली विक्षिप्त व्यक्ती ही स्वातंत्र्याला भीक म्हणू शकते. स्वातंत्र्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी अशा लोकांना पद्मश्री देणाऱ्या नरेंद्र मोदींनी याचे उत्तर द्यायला हवे. आपण स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरा करत आहोत की तुमच्या भक्ताच्या म्हणणयानुसार मिळालेल्या स्वातंत्र्याचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.