नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्या लखीमपुर शेतकऱ्यांच्या आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गंभीर पावले उचलली आहेत. न्यायालयाने स्वतः लक्ष घातले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. याप्रकरणी दोन वकिलांनी मंगळवारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
दोन वकिलांनी मंगळवारी लखीमपुर हिंसाचाराचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात नेला होता. गृह विभाग आणि पोलिसांना मंत्र्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे असे निर्देश द्यावेत, हिंसाचारात झालेल्या हत्येचा उच्चस्तरीय न्यायिक तपास करण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात यावा, अशा मागण्या या याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन दिवसापासून लखीमपुर हिंसाचाराच्या घटनेमुळे संपूर्ण देशातील वातावरण तापलेले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मुलाने गाडी घुसवल्याने मोठा हिंसाचार झाला आहे. पोलिसांनी मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी एकाही आरोपीस अटक केलेली नाही. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.