चंदिगड : प्रतिनिधी
पंजाबमधील काँग्रेस पक्षाअंतर्गत वाद काही थांबायला तयार नाहीत. नुकतेच काँग्रेसने मुख्यमंत्र्यांसह राज्यमंत्रिमंडळात फेरबदल केले आहेत. अंतर्गत वादामुळे आज काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी . नड्डा यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच आज नवज्योतसिंग सिद्धू यांनी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
नुकतेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये अशांतता निर्माण झाली होती. अशातच काँग्रेस हायकमांडनने चन्नी यांना मुख्यमंत्री बनवत अशांतता दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र आठ दिवस होताच काँग्रेसचा दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी राजकीय भूकंप केला आहे. भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदर सिंग हे अमित शहा व जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी गेले आहेत. तर दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू यांनी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
सिद्धू यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी कुठल्याही प्रकारे नाराज नाही. मी अन्य पक्षातही प्रवेश करणार नाही. मी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. येथून पुढे पक्षासाठी काम करणार आहे.
दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांनी पद सोडण्याचे कारण सांगितले नाही. नवीन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याच्या तसेच त्यांना गृहमंत्री पद दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत.