महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक मविआमध्ये जाण्याची शक्यता!
महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेने त्यांच्या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. महापालिकेत भाजपकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सर्वांनाच पदे शक्य नसल्याने नाराजांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी बंदोबस्त सुरू केला आहे.
मागील महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपचे वारे होते. त्यामुळे पुण्यात भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले. सत्ता मिळविण्यासाठी नव्या तसेच अन्य पक्षांतील आयारामांना संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक जण लाटेत निवडून आले. गेल्या चार वर्षांत बहुतांश नगरसेवकांकडून प्रमुख पदे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, मानाच्या समजल्या जाणाऱ्या पदांवर केवळ बारा जणांना संधी मिळाली आहे. त्यामध्येही मूळ भाजपमधील आणि भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्यांमध्ये सुप्त संघर्ष उफाळला आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या कामकाजात आणि संघटनेतही उमटू लागले असून, आगामी निवडणुकीत भाजपला बंडखोरी-पक्षांतरे रोखण्यासाठी आटापिटा करावा लागणार आहे.
भाजपच्या संघटनेतील जाणकारांनी मिळविलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे महापालिकेतील १९ नगरसेवक ‘काठावर’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या नगरसेवकांवर पक्षाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. येत्या निवडणुकीत यातील किती जणांना पुन्हा संधी मिळणार आणि किती जणांचा पत्ता कापला जाणार याचाही अंदाज सगळेच जण घेत आहेत. या व्यतिरिक्त भाजपच्या बालेकिल्ल्यात उपद्रव करू शकतील, अशा नगरसेवकांवरही लक्ष असल्याची माहिती उच्चपदस्थ नेत्याने दिली.