जेजुरी : प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या मल्हार गडावर सोमवती अमावस्येनिमित्त यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत खंडेरायाचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. हजारो भाविकांनी गर्दी करत पालखी मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा अनुभवला.
सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरीत मोठी यात्रा भरत असते. आज या यात्रेनिमित्त सकाळी ७ वाजता खंडेरायाचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी निघाला. यावेळी जमलेल्या भाविकांनी यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण केली. त्यामुळे अवघी जेजुरी भंडाऱ्यात न्हाऊन निघाली.
या यात्रेनिमित्त सुमारे २ लाख भाविकांनी खंडेरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला. खंडेरायाच्या दर्शनासाठी रात्री २ वाजल्यापासूनच भाविकांनी मल्हार गडावर रांगा लावल्या होत्या. सकाळी पालखी सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर भाविकांनी याची देही याची डोळा हा अनोखा सोहळा अनुभवला. दुपारी कऱ्हा स्नानालाही भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.