कवठेमहांकाळ : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवापूर्वी सर्वच जण घरात स्वच्छता, साफसफाई आणि धुणी-भांडी करताना दिसतात. त्यात घरातील पुरुष मंडळीही मदतीसाठी सरसावतात. अशातच कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरात्रीनिमित्त घरातील धुणी धुण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा तलावात पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.
राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (१८, रा.दोघेही करोली टी, ता. कवठेमहांकाळ) असं या बापलेकाचं नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, करोली टी येथील चव्हाण कुटुंबीय नवरात्रीची तयारी करत होते. यासाठी राजेंद्र चव्हाण आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे घरातील धुणी धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. या दरम्यान, या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
संध्याकाळी या तलावाच्या परिसरात काही ग्रामस्थ गेले. त्यावेळी तलावाच्या काठी धुणे दिसले, मात्र तिथे कोणीही व्यक्ती आढळली नाही. त्यावेळी त्यांनी तलावात पाहणी केली असता या दोघांचेही मृतदेह दिसले. ग्रामस्थांनी तात्काळ याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, धुणे धूत असताना ते पाय घसरून पाण्यात पडले असावेत असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सांगलीतील रेस्क्यू टीमने या दोघा बापलेकाचे मृतदेह बाहेर काढले. रात्री उशिरा कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल पोलिस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली.