Site icon Aapli Baramati News

सातारा ब्रेकिंग : सातारा जिल्हा हादरवून सोडणाऱ्या घटनेचं सत्य आलं समोर; चुलत भावानंच ‘या’ कारणातून केला पती-पत्नीचा निर्घृण खून

ह्याचा प्रसार करा

सातारा : प्रतिनिधी    

सातारा जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या माण तालुक्यातील आंधळी गावातील पती-पत्नीच्या हत्येप्रकरणातील आरोपीला दहीवडी पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून चौकशीत हत्येमागील धक्कादायक कारणही उघडकीस आले आहे. संबंधित आरोपी हा मृत शेतकऱ्याचा चुलत भाऊ असून त्यानेच या पती-पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे.

दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार असे या आरोपीचे नाव आहे.  त्याने सख्खा चुलत भाऊ संजय पवार आणि त्यांची पत्नी मनीषा यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. रविवारी सकाळी ही घटना उघड झाल्यानंतर दहीवडी पोलिसांसह सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. त्यामध्ये दादासो पवार याच्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला अटक केली.

संबंधित आरोपीच्या मुलीवर काही वर्षापूर्वी अत्याचाराची घटना घडली होती. त्यातून मृत दांपत्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला होता. याचाच राग मनात धरून या तरुणाच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा चंगच आरोपीने बांधला होता. पोलिसांना त्याच्यावर संशय असल्यामुळे त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर तो फलटणला गेल्याचं पुढे आलं. त्यानंतर तो आंधळी गावात येत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

रात्री वीज आल्यानंतर त्याने शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या या दांपत्यावर हल्ला केला. कुऱ्हाडीने वार करत त्याने दोघा पती-पत्नीचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे. दहिवडीच्या पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला जेरबंद केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version