Site icon Aapli Baramati News

POLITICAL BREAKING : अजितदादांकडून सातारकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचे संकेत; राज्यसभेची जागा साताऱ्यालाच देणार : मुंबईतील बैठकीत घोषणा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यातून राज्यसभेवर खासदार पाठवणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानंतर आज मुंबईत झालेल्या बैठकीत अजितदादांनी राज्यसभेची जागा साताऱ्यालाच देणार असल्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने ठरवल्यानुसार ही जागा सातारा जिल्ह्यालाच देणार असून अन्य कोणीही याबाबत आग्रह धरू नका अशी स्पष्ट सुचनाच आज अजितदादांनी केली. त्यामुळे अजितदादांनी सातारकरांना दिलेला शब्द पूर्ण होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसला मिळणार अशी चर्चा होती. ऐनवेळी भाजपने छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या प्रचारासाठी अजितदादांनी सातारा जिल्ह्यात झालेल्या सभेत राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्यालाच देणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आज मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्यालाच मिळणार यावर अजितदादांनी शिक्कामोर्तब केले आहे.

आज मुंबईतील वानखेडे क्लब हाऊसमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना अजितदादांनी राज्यसभेच्या जागेबाबत भूमिका स्पष्ट केली. साताऱ्याच्या बदल्यात मिळालेली राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्यातच द्यायची हा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार राज्यसभेला सातारा जिल्ह्यातीलच उमेदवार असणार आहे, त्यामुळे अन्य कोणी त्यासाठी आग्रह करू नका असं अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

दरम्यान, वाई तालुक्यात झालेल्या सभेत बोलताना अजितदादांनी उदयनराजे भोसले यांना १ लांखाचं मताधिक्य द्या, नितीन पाटील यांना खासदार करून दाखवतो असा शब्द दिला होता. आता आज झालेल्या बैठकीत राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्यातच देणार असल्याचे जाहीर करून अजितदादांनी पुन्हा एकदा आपला शब्द हाच प्रमाण हे सूत्र सिद्ध करून दाखवले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version