सांगली : प्रतिनिधी
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजपाचा झेंडा दिसेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी पवार साहेबांचे विचार आणि पक्ष कोणीच संपवू शकत नाही, असे म्हटले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
रोहित पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादीचा मोठा हात आहे. पवार साहेबांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचा विकास कोणी केलेला आहे, याबद्दल जनतेला कल्पना आहे. शेतकऱ्यांना अधिक माहिती आहे. त्यामुळे पक्ष असा संपू शकणार नाही. पवार साहेबांचे विचार आणि पक्ष कोणी कोणी संपू शकणार नाही, असे रोहित पाटील यांनी म्हटले.
कोणताच पक्ष आणि संघटना संपत नसते.आपला जन्मच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालेला आहे. त्यामुळे मी दुसरीकडे कोठेही जाणार नाही. पक्षाने आम्हाला नेहमीच साथ दिलेली आहे. यापुढेही ही साथ अशीच राहणार आहे. त्यामुळे मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, असेही रोहित पाटलांनी नमूद केले.