Site icon Aapli Baramati News

KOLHAPUR : सांगलीतल्या पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव; पण कुटुंबीयांसोबत फोटो काढायचा राहिला, अजितदादांनी स्वत: बोलवून घेतलं..!

ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी कोल्हापूरमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या दरम्यान सांगलीतील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा सत्कारही अजितदादांनी केला. मात्र या अधिकाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीयही आल्याचं लक्षात येताच अजितदादांनी स्वत: आवाज देत त्यांना बोलावून घेतलं आणि या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत फोटो काढला. त्यामुळं अजितदादांची ही आगळीवेगळी कृती चर्चेचा विषय ठरली.

काल कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहण समारंभानंतर पोलिस खात्यासह विविध खात्यातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अजितदादांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये अॅसिड कारखान्यातील स्फोटाबाबत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी फडणीस हे आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते. विशेष म्हणजे त्यांचा चिमूकलाही पोलिसांच्या गणवेशात आला होता. रविराज फडणवीस यांना गौरवल्यानंतर ही बाब अजितदादांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ अरे, त्या लहान मुलाला बोलवा, त्यांचा फॅमिली फोटो राहिलाय असं म्हणत त्या कुटुंबीयांना बोलावलं. बाळ नटूनथटून आलंय आणि आपला फोटो राहिला ना असं म्हणत फडणीस कुटुंबीयांसोबत फोटोही काढला. पोलिस गणवेशातील त्या चिमूरड्याला पाहून अजितदादांनी आपुलकीनं विचारपूस केली. अजितदादांचं ही आगळीवेगळी कृती उपस्थित मान्यवरांसह नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

अजितदादा हे शिस्तप्रिय, कामाला महत्व देणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र अजितदादा जितके कठोर वाटतात, तितकेच संवेदनशील अन् हळवे आहेत हे अनेक उदाहरणातून पाहायला मिळतं. कोल्हापूरमध्ये काल घडलेला प्रसंगही अजितदादांच्या स्वभावाचं वेगळेपण दाखवणारा होता. त्याचवेळी उत्कृष्ठ कामगिरीबद्दल झालेल्या गौरवासह स्वत: अजितदादांनी बोलावून कुटुंबियांसोबत फोटो काढला ही बाब फडणीस कुटुंबीयांच्या आनंदात भर घालणारा ठरला. त्यामुळंच अजितदादांना ‘माणूस जीवाभावाचा’ असं का संबोधलं जातं याचीही प्रचिती उपस्थितांना आली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version