Site icon Aapli Baramati News

INDAPUR BREAKING : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव लागला जिव्हारी; काझडमध्ये शिवीगाळ करत केला हवेत गोळीबार, वालचंदनगर पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

गावचं राजकारण म्हटलं की अतिशय चुरस ही ठरलेली असते. गावकी-भावकीच्या राजकारणात भल्याभल्यांचं पानिपत होतं असंही म्हटलं जातं. त्याचाच प्रत्यय इंदापूर तालुक्यातील काझड येथे आलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत हवेत गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शिवदास काटकर यांनी याबाबत वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर काझड परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, काल काझड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये एका गटाने यश मिळवले. तर दुसऱ्या गटातील उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातूनच रात्री राहुल व समीर यांनी गावात येऊन शिवीगाळ करत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. काझड-अकोले रस्त्यावर भर चौकात ही घटना घडली.

या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर वालचंदनगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास वालचंदनगर पोलिस करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर काझड गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version