कराड : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासकामांबद्दल किती दक्ष असतात याची उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. संबंधित कामाचा दर्जा हा चांगला आणि दीर्घकाळ टिकणारा असावा असा अजितदादांचा प्रयत्न असतो. त्याचाच प्रत्यय कोयना प्रकल्प येथील नवीन विश्रामगृहाच्या उदघाटनप्रसंगी आला. अजितदादांनी या कामाची उजळणी घेण्यास सुरुवात केल्यानं अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं.
कोयना प्रकल्पातील नवीन विश्रामगृहाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, विक्रमसिंह पाटणकर आदींसह पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अजित पवार यांनी या नव्या विश्रामगृहाची अत्यंत बारकाईने पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामाच्या दर्जाबाबत अजितदादांचा काहीसा हिरमोड झाल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांची उजळणी घेतली. अजितदादांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यामुळे अधिकाऱ्यांची काही काळ चांगलीच भंबेरी उडाली होती.
कोणतेही विकासकाम हे चांगल्या दर्जाचे आणि दीर्घकाळ टिकणारे असावे यावर अजितदादांचा कटाक्ष असतो. त्यामुळे प्रत्येक काम ते अत्यंत बारकाईने पाहत असतात. एखाद्या अभियंत्यालाही सापडणार नाही अशा चुका अजितदादा शोधतात. त्यामुळे अजितदादांचा दौरा म्हटलं की अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. त्यातच आज कोयना प्रकल्पातील नव्या विश्रामगृहाच्या उदघाटनप्रसंगी अधिकाऱ्यांची चांगलीच पाचावर धारण बसली.