दौंड : प्रतिनिधी
प्रेमविवाह झाल्यामुळे मानपान मिळाला नाही, माहेरून सोन्याची अंगठी आणि घरासाठी दोन लाख रुपये आणावेत यासाठी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ होत असल्यामुळे पुणे शहर पोलिस दलातील पोलिस अंमलदाराच्या गरोदर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी संबंधित विवाहितेच्या मृतदेहासह तीन तास दौंड पोलिस ठाण्यात ठिय्या दिल्यानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यासाह एकूण पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेता रोहित ओहोळ (वय २३ , रा. रेल्वे हायस्कूल रस्ता, बंगला साइड, दौंड) असं या घटनेतील मृत विवाहितेचं नाव आहे. तिचा पती रोहित ओहोळ हा पुणे शहर पोलिस दलात कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यात सासरच्या लोकांनी श्वेताला त्रास द्यायला सुरुवात केली. पती रोहितसह सासू, दीर आणि आतेसासूकडून तिचा छळ सुरू होता.
पती रोहित हा आपल्या प्रेमविवाहामुळे कोणताच मानपान झाला नाही. त्यामुळे मला सोन्याची अंगठी करायला सांग. तसेच नवीन घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आण असे म्हणत तिला मारहाण करत असे. यातूनच दि. २० डिसेंबर रोजी रात्री श्वेता ही राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. काल पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी श्वेताच्या मृतदेहासह थेट दौंड पोलिस ठाणे गाठले.
सासरच्या मंडळींनीच श्वेताचा खून केल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. श्वेताचा पती रोहित हा पुणे शहर पोलिस दलात असल्यामुळे स्थानिक पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी नातेवाईकांची समजूत काढत संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.
या प्रकरणी श्वेता ओहोळ हिची आई पद्मा गणेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती पोलिस अंमलदार रोहित रवींद्र ओहोळ, दीर रोहन रवींद्र ओहोळ, नणंद रितू रवींद्र ओहोळ, सासू रमा रवींद्र ओहोळ व आतेसासू राणी वसंत जाधव ( सर्व रा. रेल्वे हायस्कूल रस्ता, बंगला साइड, दौंड ) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, अजात गर्भाचा मृत्यू घडवून आणणे, हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.