सातारा : प्रतिनिधी
शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर सातारा जिल्हा हादरला असून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
संजय रामचंद्र पवार (वय ४९) आणि मनीषा संजय पवार (वय ४५) असे या दुर्दैवी दांपत्याचं नाव आहे. पवार कुटुंबीय माण तालुक्यातील आंधळी येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संजय व त्यांच्या पत्नी मनीषा यांच्यासह शेतात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. या दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत या पती-पत्नीचा निर्घृणपणे खून केला.
आज सकाळी या परिसरातील शेतकरी शेतात गेल्यानंतर या दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. दरम्यान, या दोघांच्याही डोक्यावर, मानेवर आणि गळ्यावर वार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर दहीवडी पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा तपास सुरू केला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत दबक्या आवाजात चर्चा होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून हल्ला कोणी केला याचाही शोध घेतला जात आहे.