Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : खून, दरोड्यासह गंभीर गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार लखन भोसले जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मोक्का, खून, दरोडे, घरफोडी, जबरी चोरी यासह जवळपास २२ गंभीर गुन्ह्यात फरारी असलेल्या लखन भोसले या सराईत गुन्हेगाराला बारामती तालुक्यातील घाडगेवाडी येथून जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. तब्बल एक किमी पाठलाग करत या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली.

लखन उर्फ महेश पोपट भोसले (रा. वडगाव जयराम स्वामी, ता. खटाव, जि. सातारा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार अभिजीत एकशिंगे आणि स्वप्नील अहिवळे यांना लखन भोसले हा बारामती तालुक्यातील घाडगेवाडी येथे आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.

मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी या पथकाने घाडगेवाडीत जाऊन लखन भोसले याचा शोध घेतला. त्यावेळी तो एका घरासमोर थांबल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र पोलिसांना पाहिल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या पथकाने तब्बल एक किमी पाठलाग करत या गुन्हेगाराला ताब्यात घेतले.  लखन भोसले याच्यावर सातारा जिल्ह्यातील दहिवडी, म्हसवड, वडुज, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका, वडगाव निंबाळकर आणि इंदापूर पोलिस ठाण्यात घरफोडी, जबरी चोरी, मोक्का, दरोडा, खून असे तब्बल २२ गुन्हे दाखल आहेत. तो गेली अनेक दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या अधिपत्याखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिद पाटील, पोलिस हवालदार अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, सहाय्यक फौजदार मुकुंद कदम, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, वडगाव निंबाळकरचे पोलिस नाईक हिरालाल खोमणे, हृदयनाथ देवकर, पोलिस मित्र दादा कुंभार, बारामती तालुक्याचे हवालदार राम कानगुडे, अमोल नरुटे, दीपक दराडे, माळेगाव ठाण्याचे राहुल पांढरे, विजय वाघामोडे, ज्ञानेश्वर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version