Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : बारामतीसह परिसरात रात्र ठरतेय वैऱ्याची; रात्री-अपरात्री अज्ञात ड्रोनच्या घिरट्यांनी ग्रामस्थ भयभीत, पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून होईना खुलासा..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे यानंतर काही ठिकाणी चोरीच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून कोणताही खुलासा झालेला नाही. परिणामी आता रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या ड्रोनच्या घिरट्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटनाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

बारामती तालुक्यात मागील काही दिवसांत पाच ते सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असं इथल्या स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. रात्रीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी आता रात्र गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. ड्रोन दिसल्यानंतर अनेकदा पोलिसांना माहिती दिली जाते. परंतु पोलिस पोहोचेपर्यंत ड्रोन गायब होत असल्याचे प्रकारही घडत आहेत.

केवळ बारामती तालुक्यातच नव्हे तर आसपासच्या अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र पोलिस अथवा प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबत कसलाही खुलासा झालेला नाही. हे ड्रोन नेमके कोण फिरवत आहे याचाही आजवर शोध लागलेला नाही. उलट ड्रोन फिरल्यानंतर लगेच चोरीच्या घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती वाढत आहे.

आजवर अनेक ठिकाणी ड्रोन फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत काहीच कारवाई होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे ड्रोन फिरत असल्याच्या घटनांबाबत प्रशासनाकडून सध्या तरी बघ्याचीच भूमिका घेतली गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार घडूनही ड्रोनच्या घिरट्यांचे गूढ उकलत नसल्याने पोलिस व प्रशासकीय यंत्रणाच कुचकामी ठरल्याचे बोलले जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version