फलटण : प्रतिनिधी
जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना फलटण शहरात घडली आहे. हनुमंतराव रामभाऊ पोतेकर (वय ५५) आणि मुलगा अमित पोतेकर (३२, दोघेही रा. गजानन चौक, फलटण) अशी या घटनेत मृत पावलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. या घटनेमुळे फलटण परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर येणार आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी दि. ८ जुलै रोजी फलटण शहरातील गजानन चौकात वास्तव्यास असणारे हनुमंतराव पोतेकर, त्यांची पत्नी, मुलगा अमित व मुलगी श्रद्धा यांनी शनिवारी रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर हनुमंतराव, अमित व श्रद्धा यांनी आयुर्वेदिक काढा प्राशन केला. त्यानंतर हे सर्वजण झोपी गेले. दरम्यानच्या काळात मध्यरात्री या तिघांनाही त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्यांना फलटण शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असताना वडील हनुमंतराव आणि मुलगा अमित या दोघांचा अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. तर मुलगी श्रद्धा हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या घटनेमुळे फलटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फलटण शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोतेकर कुटुंबीयांनी नेमका कोणता काढा घेतला आणि कशामुळे त्रास झाला याबद्दल आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. काढा पिल्यानंतरच या पिता-पुत्रांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. असे असले तरी त्यांच्या मृत्यूचे सत्य हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे.