नीरा : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, गुंजवणी व वीर धरणांत सध्या जवळपास १२ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी नीरा खोऱ्यातील धरणांत २ टीएमसीपेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे.
पुणे, सातारा, सोलापुर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या वीर धरणांत ५४.१० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे मान्सुन पावसाने उशीरा हजेरी लावली तरी नीरा नदीकाठच्या तसेच दोन्ही कालव्याच्या लाभक्षेञातील शेतकऱ्यांना काही दिवस का होईना पाण्याची टंचाई भासणार नाही.
नीरा खोऱ्यातील धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता नीरा देवघर धरणांत २३९४ द.ल.घ. फुट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २०.४१ टक्के आहे. तर ब्रिटीशकालीन भाटघर धरणांत ३६४९ द.ल.घ.फुट उपयुक्त पाणी साठा असून त्याची टक्केवारी १५.५३ टक्के आहे. तसेच वीर धरणामध्ये ५०८९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ५४.०९ टक्के आहे. तर गुंजवणी धरणांत ९९९ द.ल.घनफूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २७.०७ टक्के आहे.
एकंदरीत निरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणात सरासरी २५.१० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत नीरा डावा व नीरा उजवा कालव्यातून विसर्ग सुरू राहणार असून पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याकरिता पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, नीरा उजवा कालव्यातून १५५० क्युसेक्सने, तर डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.