Site icon Aapli Baramati News

पत्नी आणि मुलाची हत्या करून नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ; श्रीरामपूरमधल्या घटनेनं खळबळ

ह्याचा प्रसार करा

अहमदनगर : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एक धक्कादायक आणि जीवाचा थरकाप उडवणारी घटना उघड झाली आहे. पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलाची हत्या करुन त्याचा व्हिडीओ तयार करून तो नातेवाईकांना पाठवल्याचा प्रकार घडला आहे. रामनवमीदिवशी घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

बलराज दत्तात्रय कुदळे असे या माथेफिरूचे नाव आहे. व्यवसायाने ट्रकचालक असलेला बलराज आपली पत्नी अक्षदा आणि पाच वर्षांचा मुलाग शिवतेज यांच्यासह श्रीरामपूरमधील दिघी येथे वास्तव्यास होता. बलराज आणि त्याची पत्नी अक्षदा यांच्यात मागील गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. सततच्या भांडणाला कंटाळून अक्षदा मुलासह माहेरी निघुन गेली होती.

नुकतीच ती माहेरहून सासरी आली होती. मात्र बलराजच्या डोक्यात ती माहेरी निघून गेल्याचा राग होता. रविवारी सकाळी अक्षदा ही घरात काम करत असताना बलराजने पाठीमागून येवून तिच्या डोक्यात कुदळ घातली. यामध्ये अक्षदाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आपल्या मुलाला घराजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीने फाशी देत त्याचाही जीव घेतला.

या घटनेनंतर बलराज काही काळ तिथेच थांबला. त्यानं आपल्या मोबाईलवरून दोघांचेही व्हिडीओ चित्रीत करून ते व्हिडीओ नातेवाईक आणि ग्रामस्थांना पाठवला. तसेच आपल्या मेहुण्याला व्हिडीओ कॉल करून पत्नी व मुलाचा मृतदेह दाखवून तुझ्या बहिणीला आणि भाच्याला खलास केलंय, त्यांच्या मयतीला ये असे सांगितले.

एवढ्यावरच न थांबता त्याने हे व्हिडीओ आपल्या व्हाटसअप स्टेटसलाही ठेवले. या घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये एकच खळबळ उडाली. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी बलराज राहत असलेले घर पेटवून दिले. दरम्यान, पोलिसांनी या माथेफिरू आरोपीला अटक केली असून श्रीरामपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version