
चंद्रपूर : प्रतिनिधी
सेल्फी काढत असताना पाय घसरून पडलेल्या मित्राला वाचवताना दुसराही मित्र पाण्यात पडला आणि या दोघा जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलावात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
हार्दिक गुळघाने (वय १९) आणि आयुष चिडे (वय १९) अशी मृत्युमुखी पडलेल्या जीवलग मित्रांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, हे दोघेही फिरण्यासाठी म्हणून चारगाव सिंचन तलावावर गेले होते. त्यावेळी सेल्फी घेत असताना एकजण पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्रानेही पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक व मासेमारांच्या दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल २ तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दोन जीवलग मित्रांचा एकाचवेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.