
चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे जिल्हा हादरवणारी घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात चंद्रपूरमधील भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा नाहक बळी गेला आहे. दार ठोठावले म्हणून दार उघडण्यासाठी गेल्यानंतर अचानक या महिलेवर गोळीबार झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला असून कोळसा व्यवसायातील वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
पूर्वशा सचिन डोहे असं या महिलेचं नाव असून त्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी आहेत. तर लल्ली शेरगिल असं या घटनेतील जखमी व्यक्तीचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, अज्ञात हल्लेखोर हे लल्ली शेरगिल याचा पाठलाग करत होते. लल्ली हा आपला जीव वाचवण्यासाठी राजुरा शहरातील सोमनाथपुरा येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरात घुसला.
संबंधित हल्लेखोर पाठलाग करत या घराजवळ आले. त्यावेळी या हल्लेखोरांनी डोहे यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी पूर्वशा डोहे या दार उघडण्यासाठी आल्या. त्यांनी दार उघडताच संबंधित हल्लेखोरांनी थेट त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात पूर्वशा यांचा जागीच मृत्यू झाला. तर दारावर आलेल्या लल्ली शेरगिल हाही या गोळीबारात जखमी झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील एकजण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. लबज्योत देवल असे यातील एका आरोपीचे नाव आहे. काल रात्री घडलेल्या या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. परंतु पोलिसांनी तपास यंत्रणा लावत या दोघांना ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, या घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. एका निष्पाप महिलेला आपला जीव नाहक गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. कोळसा व्यवसायातील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.